दोन जागा सोडण्यास शिंदेंचा विरोध
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महायुतीत तीन पक्ष असल्यानं जागावाटपाचा तिढा कायम असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य एन्ट्रीमुळे पेच आणखी वाढला आहे. महायुतीत चौथा भिडू म्हणून येत असलेल्या मनसेला दोन जागा सोडण्यास शिंदेंचा प्रचंड विरोध आहे. यावेळी राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे.
याबद्दल राज्य भाजपच्या नेतृत्त्वानं शिंदेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री अमित शहा या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार आहेत. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. 40 मिनिटांच्या बैठकीत राज आणि अमित शहांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली. या बैठकीला राज यांचे पुत्र अमित ठाकरे उपस्थित होते.
राज यांनी भाजपकडे दोन जागांची मागणी केली आहे. दक्षिण मुंबईसाठी मनसे प्रामुख्यानं आग्रही आहे. यासोबतच शिर्डी, नाशिक या मतदारसंघांची मागणीही राज यांनी केली आहे. शिर्डी, नाशिकपैकी एक मतदारसंघ मनसेसाठी सोडावा, असा आग्रह राज यांनी धरला आहे. मनसेला सोबत घेण्यास भाजप जरी उत्सुक असला तरी राज यांच्या मागणीला शिंदेंचा विरोध कायम आहे.