प्रशासनाकडून पूजा साहित्याचे दर निश्चित
| अहमदनगर | प्रतिनिधी |
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आता शिर्डीचे प्रशासन एकवटले आहे. दुकानदारांकडून प्रसाद, मूर्ती आणि इतर वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे कठोर पावले उचलली आहेत. याअंतर्गत शहरातील सर्व वस्तूंसाठी संदर्भदर निश्चित करण्यात आले असून, त्याचे पालन सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.
या निर्णयामुळे भक्तांची फसवणूक थांबेल तसेच प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासाही मिळणार आहे. नगरपरिषदेने ठराव करून व या व्यवसायातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या दरपत्रकास कायदेशीर मान्यता दिली आहे. या नव्या नियमांनुसार, प्रत्येक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांना प्रशासनाने ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. तसेच, प्रत्येक वस्तूवर दुकानाचे नाव, किंमत, एक्सपायरी तारीख आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 15 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
यानंतर, विशेष भरारी पथके शहरात नियमित पाहणी करून नियमांचे पालन होते की नाही, याची कडक तपासणी केली जाईल. माहितीच्या प्रसारासाठी प्रशासनाकडून क्युआर कोड आणि सार्वजनिक ठिकाणी फलकही लावले जाणार आहेत. प्रशासनाच्या या नव्या नियमावलीमुळे अव्वाच्या सव्वा दराने वस्तू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत