। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत यावेळी सर्वांचे लक्ष होते ते तिरंदाज शीतल देवी हिच्या कामगिरीवर. 17 वर्षाच्या या पोरीने जगाला आपल्या तिरंदाजीच्या कौशल्याने चकित करून टाकले आहे. जन्मतः दोन्ही हात नसलेली शीतल पायाने तिरंदाजी करते आणि मागच्या वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकून तिने इतिहास घडवला होतो. यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतही तिने जागतीक विक्रम मोडीत काढला आहे. यावेळी 700 हून अधिक गुण कमावणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. परंतु, अवघ्या एका गुणाच्या फरकाने तिला क्रमांक एकचे स्थान गमवावे लागले आहे.
यावेळी शीतल देवीने पॅरालिम्पिक स्पर्धेत 720 पैकी 703 गुण मिळवून जागतिक विक्रम केला आहे. शीतलने मागच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या जेसीका स्ट्रेटॉनचा 694 गुणांचा पॅरालिम्पिक विक्रम आणि ग्रेट ब्रिटनच्याच फोबी पॅटरसनचा 698 गुणांचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. परंतु, शीतलचा जागतीक विक्रम आजच तुर्कीच्या ओझनूर क्युरने काही क्षणात मोडला आणि तिने 704 गुणांसह नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.
जम्मू आणि काश्मीरमधील शितल देवी ही एका दुर्मिळ जन्मजात आजाराने ग्रासली होती. त्यामुळे तिचे हात अविसकसित राहिले. 2021 मध्ये तिच्या गावी भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या युवा कार्यक्रमादरम्यान तिची क्रीडा प्रतिभा शोधली गेली. प्रशिक्षक आणि कुटुंबीयांनी कृत्रिम हात मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो बसला नाही. तिच्या पायांमध्ये ताकद आहे, याची तिला जाणीव झाली. सुरुवातीला तिरंदाजी करताना पाय दुखायचे पण तरी तिने माघार घेतली नाही. तिच्या प्रशिक्षकांनी स्थानिक साहित्य वापरून तिचे किट तयार केले होते. त्यांना तिच्यासाठी एक विशिष्ट्य शैलीही तयार करावी लागली. तिने सुरुवातीला रबर बँडने सरावाला सुरुवात केली. हळुहळू ती 50 मीटर अंतरावर बाण मारू लागली.