जिल्ह्यात तिथीनुसार शिवजयंतीचा जल्लोष

| अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी अभिवादन केले. रायगड जिल्ह्यातील विविध गड, किल्ल्यांसह सर्वत्र सार्वजनिक शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, यानुसार शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. अनेकठिकाणी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रमसुद्धा शिवजयंतीनिमित्त घेण्यात आले. मिरवणुका, शिवरायांच्या पूजनही करण्यात आले.

नेरळ शाळेत प्रभात फेरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे आलेल्या जयंती निमित्त विद्या विकास मंदिर शाळेने आपल्या असंख्य विद्यार्थ्यांसह नेरळ गावात प्रभात फेरी काढली.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा केला. विद्या विकास मंदिर शाळेच्या आवारातील निघालेली ही प्रभात फेरी अंबामाता मंदिर मार्गे बापूराव धारप सभागृह अशी कुंभार आळी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी माथेरान रस्त्याने बाजारपेठमधून पुढे गेली. त्यावेळी शिवाजी महाराज चौकात सर्व विद्यार्थ्यांनी संचालन केले. त्यात लेझिम पथक तसेच पारंपरिक वेशभूषा मधील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले संपुर्ण प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात भगवा ध्वज आणि लेझिमवर ताल धरून ठेका धरला होता.

गडब येथे भव्य मिरवणूक
ग्रामस्थ मंडळ खारघाट व हनुमान स्पोर्ट्स क्लब खारघाट यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्यांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेत पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या शिवजयंती निमित्त बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहुरकर आळंदी यांचे कीर्तन, महाराजांची आरती, ग्रामस्थ मंडळ खारघाट-गडब यांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उरणमध्ये पुजा अर्चा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे जयंतीचे औचित्य साधून शहर, द्रोणागिरी किल्ला, तसेच तालुक्यातील गावोगावच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक, विधिपूर्वक पुजा अर्चा आणि पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून माजी आ. मनोहर भोईर, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, बी.एन.डाकी, राजा खारपाटील, भास्कर मोकल, संदेश ठाकूर, सत्यवान भगत, संतोष पवार, म्हात्रे तसेच गावोगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

रिसवाडीत विविध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रिसवाडी येथील टाकेदेवी मित्र मंडळ, श्रीपाद हॉस्पिटल आणि साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रिसवाडी मंदिराच्या आवारात विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. यावेळी राकेश खराडे, ज्ञानेश्‍वर पाटील हे उपस्थित होते. यानंतर युवक कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सागर सुखदरे यांच्याहस्ते रक्तसंकलन व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 32 युवकांनी रक्तदान केले.यावेळी 32 रक्तबॅगांचे संकलन करण्यात आले. तर मोहोपाडा येथील श्रीपाद हॉस्पिटलच्यावतीने रिसवाडी गावातील लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात तपासणी शिबिराचा लहानांसह 66 नागरिकांनी लाभ घेतला व आपल्या आजारपणाच्या समस्येचे निराकरण करुन घेतले.

Exit mobile version