पनवेलमध्ये शिवजयंतीचे आयोजन

लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात मिरवणुक

| पनवेल | वार्ताहर |

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने सोमवार (दि.19) लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरामध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. पनवेल शहरामधील मिरवणुकीच्या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार नुकतीच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये घेण्यात आली.

या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचे नियोजन या बैठकित करण्यात आले. यानिमित्ताने लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. या मिरवणुकीमध्ये विविध शाळा, संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सहभागाची पूर्वनोंदणी महापालिकेकडे करणे गरजेचे असल्याचे उपायुक्त कैलास गावडे यांनी या वेळी सांगितले. याबरोबरच सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज भव्य मिरवणुकीस सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर आठ वाजता महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. हुतात्मा स्मारक चौक, आदर्श लॉज, गावदेवी मंदिर, सावरकर चौक, पालिका मुख्यालय, सेवा योजना कार्यालय, मौलाना आझाद चौक मार्गे मिरवणुकीचा शेवट टपाल नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा चौकामध्ये होणार आहे. या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version