| पनवेल | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित पं. हृदयनाथ मंगेशकर यांची सांगितिक मैफिल असलेल्या ‘शिव कल्याण राजा’चे आयोजन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड यांनी केले आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि.24) सायंकाळी 730ः वाजता सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला प्रवेश राहणार आहे. रसिक तसेच छत्रपती प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
समर्थ रामदास स्वामी, कविराज भूषण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, शंकर वैद्य, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्वातंत्र्य समराचा धगधगता अग्नीकुंड म्हणजे भावगंधर्व, पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आवेगी शब्दांना चाल देताना त्यात शिवतेज आणि ओज पुरेपूर ओतलेले आहे. त्यातून आकारास आलेल्या अविट गोडीच्या ‘शिव कल्याण राजा’ सांगितिक मैफिलीचे आयोजन पुन्हा त्याच जोशात प्रतिष्ठानने खास पनवेलकरांच्या आग्रहाखातर केले आहे. समस्त पनवेल क्षेत्रातील शहरे आणि ग्रामीण भागात रसिक, दर्दी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे महत्कार्य कांतीलाल कडू आणि त्यांचे प्रतिष्ठान सातत्याने गेली अनेक वर्षे यशस्वी आयोजनातून करीत आहेत. या कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने भिवंडीचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी आमदार बाळाराम पाटील, सिडकोचे सहसंचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, खारघरचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम, पनवेल तहसीलदार मिनल भोसले-भामरे, अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गजानन घाडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव शर्वाय कडू यांनी दिली आहे.
पनवेलमध्ये अवतरणार ‘शिव कल्याण राजा’
