ठाणे-कल्याण जागेवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच


| ठाणे | वृत्तसंस्था |

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीत आजही जागा वाटपावरून एकमत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेवरूनदेखील शिवसेना भाजपत रस्सीखेच सुरू आहे.

ठाणे लोकसभेवर शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेनेने शिंदे गटाकडून विभागावर बैठका घेण्यात येत आहे. शनिवारी टेंभीनाका येथील आनंदाश्रमात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे लोकसभेवर दावा करीत, स्वपक्षीयालाच उमेदवारी मिळावी, अशी भूमिका पदाधिकार्‍यांकडून घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी दुसरीकडे अनेक जागांवरून मतभेद सुरू असून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात, यासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यातच शिंदे सेनेकडून आणि भाजपकडून अनेकांची नावे यासाठी पुढे येत आहेत. भाजपकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मात्र, शिंदे सेना देखील हा मतदारसंघ सोडण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आहे.

शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणे बदलली असली तरी ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही आहेत. असे असतानाच, भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला आहे. तसेच ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजीव नाईक यांच्याशी हातमिळवणी करीत याबाबत संकेत दिल्याची चर्चा आहे; परंतु या चर्चेमुळे ठाणे, नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी स्वपक्षातीलच पदाधिकार्‍याला हे तिकीट दिले जावे, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याचीही चर्चा आहे.

Exit mobile version