नगराध्यक्ष वैभव खेडेकरांवर शिवसेना नगरसेवकांनी केली तक्रार

। खेड । प्रतिनिधी ।
नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम अन्वये गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य नगरविकास विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.नगरपरिषदेचे शिवसेना गटनेता प्रज्योत तोडकरी, सुनील दरेकर, प्रशांत कदम, सुरभी धामणस्कर, रुपाली खेडेकर, अल्पिका पाटणे, मनीषा निर्मल, नम्रता वडके व सिमा वंडकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार केली.

चौकशीसमिती मार्फत चौकशी करुन चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी शासनास सादर केला आहे. नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना व लोकसेवक म्हणून कार्य करीत असताना काही प्रकरणी गैरवर्तन, अनियमितता व कर्तव्यात कसूर केलेली असल्याचे आढळून आले आहे. नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत केलेल्या विकास कामांच्या अंतिम बिलावर विहीत पद्धतीने कार्यवाही न करता, काही अंतिम देयकांवर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसतांना एकट्याने स्वाक्षरी केली आहे. 15 टक्के सहायक अनुदान अंतर्गत विकास कामांच्या करारनाम्यावर नगरसेविका मानसी चव्हाण या स्थायी समिती सदस्य नसताना, त्यांच्यासह स्वाक्षरी करुन 15 टक्के सहायक अनुदान अंतर्गत विकास कामांच्या अंतिम बिलावर विहीत पध्दतीने कार्यवाही न करता, काही अंतिम देयकावर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसतांना एकटयाने स्वाक्षरी केली आहे. खेड नगरपरिषद हद्दीतील बांधकाम परवानगीतील अटींची पूर्तता न करता केल्याबाबत, नगरपरिषदेतील कंत्राटी वाहनचालकाच्या सेवा स्वत:च्या वाहनासाठी उपलब्ध करुन घेणेबाबत आदी मुद्द्यांवर या चौकशी अहवालात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर आपण आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते यामुळे नगराध्यक्ष पदावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये याविषयी लेखी खुलासा पंधरा दिवसांत करण्यास बजावण्यात आले आहे. नगरनियोजन विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अहवालाच्या आधारे ही नोटीस बजावली आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरुन दूर करुन, पुढील सहा वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Exit mobile version