शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

जाहिरात फलकातून एकमेकांवर कुरघोडी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

जाहिरात फलकांवर फोटो न लावून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेचे नेते करत असल्याचे चित्र सध्या पनवेल पालिका हद्दीत पाहायला मिळत आहे. आगामी पालिका निवडणुकाणच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणार्‍या शिवसेनेतील पदाधिकार्‍यांमध्ये सुरु असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षातील गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान सेना नेत्यांसमोर आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिल्या नंतर तालुक्यातील शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग शिंदे यांच्यासोबत गेला आहे. शिंदे यांच्या सोबत गेलेल्यानमध्ये कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स व्यापारी संकुलाचे अध्यक्ष आणि ट्रान्सपोर्ट संघटनेचे कार्याध्यक्ष रामदास शेवाळे यांचा समावेश आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या शेवाळे यांच्यावर पक्षाने या पूर्वी जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जवाबदारी टाकली होती. तर त्याच वेळी आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक रुपेश ठोंबरे यांच्यावर तालुका प्रमुख पदाची जवाबदारी टाकण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढीसाठी काम करणार्‍या शेवाळे आणि ठोंबरे यांच्यात काही कारणाने वितुष्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

शेवाळे यांच्यावर पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची जवाबदारी टाकल्या नंतर देखील दोघांमधील वितुष्ट कायम असल्याचे चित्र जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्यावर शेवाळे आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान पाहायला मिळाले. शेवाळे यांनी आयोजित केलेल्या कार्यकार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर तालुका प्रमुख ठोंबरे यांचे नाव टाकणे टाळण्यात आले होते तर तालुका प्रमुख ठोंबरे यांनी तालुक्यातील खाणाव गाव येथे 6 मे पासून आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या जाहिरात फलकावर शेवाळे यांचा फोटो टाकण्याचे टाळल्याने सेना नेत्यांमध्ये असलेला हा अंतर्गत वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

फाटाफुटीचा परिणाम

मागील निवडणुकीत एकसंघ असलेल्या शिवसेनेने भाजपा विरोधात स्वबळावर निवडणूक लढवली होती मात्र त्या वेळी सनेला अपेक्षित यश मिळू शकले न्हवते. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर पालिका हद्दीतील सेनेत देखील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे यांना मानणारा गट अशी दोन शकले पडली आहेत. या पैकी उद्धव ठाकरे यांना मानणार्‍या गटात दोन गट असल्याचे या पूर्वी घडलेल्या वादामुळे स्पष्ट झाले आहे. सद्य स्थितीत हा गट शेतकरी कामगार पक्ष कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांच्या सोबत महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरा जाणार हे स्पष्ट आहे. तर राज्यात भाजपा सोबत सत्तेत असलेली शिवसेना पालिका निवडणुकीत देखील भाजपा सोबत जाण्याची शक्यता आहे. मात्र त्या पूर्वी अंतर्गत गट बाजी रोखण्याचे मोठे आव्हान दोन्ही गटांच्या नेत्यांसमोर आहे.

Exit mobile version