शिवसेना कार्यालय मूळ मालकाच्या ताब्यात

शिवसैनिक यांच्या गर्दीत गोमूत्र शिंपून केला प्रवेश

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय पोलिसांनी अखेर तीन दिवसांनी जागा मालकांच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर मंगळवारी नेरळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती शाखा कार्यालय उघडले आणि गोमूत्र शिंपून प्रवेश केला.

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची सर्वात आक्रमक शाखा म्हणून शिवसेना नेरळ येथील शाखा समजली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नेरळ येथील शाखा कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिक यांनी शाखा कार्यालयाला असलेले टाळे फोडून प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिक यांनी तेथे एकत्र येत आवाज उठविला होता आणि त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे गाठले होते. नेरळ शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे. या काळात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय हे संजय मनवे यांच्या नावे प्रॉपर्टी कार्ड असलेल्या खासगी व्यक्तीच्या नावे असल्याची कागदपत्रे पोलिसांना सादर करण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी नेरळ येथे येऊन चर्चा केली होती. शेवटी दि. 20 रात्री आठ वाजता शाखा कार्यालयाच्या मालमत्तेचे मालक संजय वसंत मनवे यांच्याकडे पोलीस अधिकारी हनुमंत शिंदे यांनी चावी सुपूर्द केली होती.

आज दि. 21 सकाळी अकरा वाजता नेरळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती शाखा कार्यालय पुन्हा उघडण्यात आले. त्याआधी प्रमुख हेमंत क्षीरसागर आणि अन्य कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपून शाखेत प्रवेश केला. शिवसैनिक आणि माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी शाखा कार्यालयाचे कुलूप खोलले. त्यानंतर जेष्ठ शिवसैनिक विजय पवार यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक संजय कांबळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तर महिला आघाडी संघटक कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे हस्ते मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय मिसाळ यांनी आनंद दिघे यांच्या तर माजी उपतालुका प्रमुख शशिकांत मोहिते, तसेच दादा ठाकरे, राजन पाटणकर, महेश पाटणकर, सुरेश जाधव यांनी फुले वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे गटाचे उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे, उप तालुका संघटक सुधाकर देसाई, शिवसैनिक संजय मनवे, रमाकांत बाचम, माजी शहर प्रमुख भाऊ क्षीरसागर, रोहिदास मोरे, पुंडलिक भोईर, सुनील राणे, प्रथमेश मोरे, योगेश भोईर, भगवान पाटील, महिला आघाडी तालुका संघटक सुमन लोंगले, उप तालुका संघटक कल्पना चव्हाण, संपर्क प्रमुख प्रीती देसाई, उप संघटक प्राची मनवे, युवती सेनेचे प्रमुख रेश्मा शिंदे, विभाग प्रमुख अंकिता मिनमिणे तसेच ज्येष्ठ महिला शिवसैनिक सुनीता मोरे, कोमल शिंदे, सुजाता भोसले, नीता मांडे, ज्योती घोडिंदे, राखी गुरव आदींसह युवा सेना शहर अधिकारी विश्‍वजित नाथ यांच्यासह नेवाळी येथील माजी शाखा प्रमुख एकनाथ दुर्गे, भडवल शाखा प्रमुख आणि अन्य उपस्थित होते.

पोलीस बंदोबस्त कायम
नेरळ शिवसेना शाखा मध्यवर्ती कार्यालय येथील नेरळ पोलीस ठाणे यांचा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. तेथे एक पोलीस अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचारी यांचा स्टाफ तैनात असल्याच्या सांगण्यात आले.

Exit mobile version