शिवसेनेच्या संजय जांभळेची स्टंटबाजी

जेएसडब्ल्यु अधिकार्‍यांना दमदाटी; पोलिसात गुन्हा दाखल
| पेण | प्रतिनिधी |
जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनीच्या अधिकार्‍यांना व कामगारांना शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी शिवसेनेचे संजय जांभळे यांच्या विरूध्द भादवि कलम 341, 447, 448, 504,506 नुसार गुन्हा नोंद झाला आहे.दरम्यान,जांभळे यांनी हे आंदोलन केले की केवळ स्टंटबाजी केली अशी जोरदार चर्चा आता पेण तालुक्यात सुरु झालेली आहे. गेल्याच आठवड्यात जांभळेनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.आपण काहीतरी करुन दाखविण्यासाठी त्यांनी हे स्टंट केले असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने जमावबंदीचे 144 कलम जारी करण्यात आले आहे.तरीही त्या जमावबंदीचा कलमाचा भंग करीत जाभळे यांनी जेएसडब्ल्यू कंपनीच्या गेटसमोर बेकायदेशीर मंडळी जमा करुन गेट अडविले आणि तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी,कर्मचार्‍यांना दमदाटी करुन जोरदार शिवीगाळही केली.यामुळे वडखळ पोलिसानी तातडीने जांभळे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.
या अगोदर देखील जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनी आणि संजय जांभळे यांचे वाद झालेले पहायला सर्वाना मिळाले आहे. त्या वेळेला देखील गुन्हे नोंद झाल्याचे समजते. परंतु दरवेळेला कंपनी प्रशासन देखील मिळतेजुळत घेऊन प्रकरण मिटविते.. या अशा गोष्टींमुळेच कंपनी प्रशासनाची देखील विश्‍वासाहर्ता कमी होत चाललेली असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version