मुर्मूंना पाठिंबा देत शिवसेनेची नरमाई

। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत शिवसेनेने नरमाईचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून आले.राज्यात राजकीय सत्तांतर झाल्याने त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे.आमदारांबरोबरच खासदारांनीही मुर्मू यांनाच पाठिंबा दिल्याचे जाहीर करीत एकनाथ शिंदेंसह भाजपशी जुळवून घेणे गरजेचे आहे,असे जाहीर केले होते.जर तसे केेले नाही तर स्वतंत्र गट स्थापन करण्याचा इशाराही दिला होता.त्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याचे बोलले जाते.

याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केली आहे.यापूर्वी आम्ही तत्कालीन काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील,प्रणव मुखर्जी यांना असाच पाठिंबा दिल्याचे स्मरणही राऊत यांनी केले.
बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  बैठकांचा सपाटा लावला आहे.  आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत  पुन्हा  एकला चलो र चा नारा दिला आहे. 

मंगळवारी (12 जुलै)  दुपारी 1 वाजता मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार हे उपस्थित होते. माजी आमदारांना तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे. आता आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्‍न आम्ही सोडवणार, असे आश्‍वासन  ठाकरे यांनी  मातोश्रीवरच्या बैठकीत दिले.

उद्धव ठाकरे यांनी आतापासून 2024 निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.  त्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. माजी आमदार शिंदे गटात जाऊ, नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आली होती.

Exit mobile version