शिवसेनेतील गद्दारी भाजप पुरस्कृत; अनंत गीते यांचा घणाघात

पालीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा; शिवसैनिकांची उसळली अलोट गर्दी

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

शिवसेनेच्या इतिहासात अनेकदा बंडखोरी झाली, अनेक जण वैयक्तिकरित्या सोडून गेले. शिवसेनेत 20 जून 2022 रोजी पहिली इतकी मोठी गद्दारी झाली. सत्तेसाठी काय पण ही भूमिका भाजपची आहे, ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजपवाल्यांनो, तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा घणाघात अनंत गीते यांनी केला.

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करतायेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता, ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली. जे शिवसेना सोडून गेलेत, त्यांची पर्वा करू नका, आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, शिवसेना आमच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गद्दारांना माफी नाही, असेही ते कडाडले.

आता कोकणातील पाच गद्दारांना कायमचे मातीत गाडणार असल्याचे गीते म्हणाले. आज मुंबई महानगरपालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजप ही धुळीस मिळेल, असे गीते म्हणाले. पालीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दि.(29) रोजी भक्त निवास 1 मध्ये अलोट गर्दीत पार पडला. या मेळाव्यास सुधागड तालुक्यातील गाव खेड्या पाड्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनंत गीते मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिवसेना बुलडोजर आहे, जे जे पायाखाली येतील ते चिरडून जातील, यावर्षीच्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होईल की चार-चार शिवाजी पार्क कमी पडतील. अनंत गीते म्हणाले, माझं वय 72 आहे, मात्र आमदारांनी गद्दारी केली म्हणून माझं वय आता 27 झालंय, आज केवळ शिवसेनेवर संकट नाही तर संपूर्ण भारत देशावर संकट आहे, जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही असलेला भारत देश, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत, आज लोकशाही संकटात आहे, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, हा विश्‍वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. अखंड भारतात शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की त्यातील कुटुंप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते व आपण सर्व कुटुंबातील सदस्य आहोत. शिवसेना हे कुटुंब आहे. शिवसैनिकांची वज्रमूठ मजबूत आहे. आणि ही वज्रमूठ आवळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यायला लावणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत, असे अनंत गीते म्हणाले. कुटुंबात भांडणं होतात, जर आई संकटात असेल, तर आपण आईला वाचवतो, आज शिवसेना संकटात आहे, आईला वाचवणे हे आपले कर्तव्य, जबाबदारी आहे, असे गीते म्हणाले.

शिवसेनेत गद्दारी झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळाव्याचा मान सुधागड तालुक्याला मिळालाय. सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, असे गीते म्हणाले.

जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की, बंडखोर आमदारांनी दिलेली कारणे म्हणजे केवळ दिशाभूल करणारी आहेत, केवळ पैशांसाठी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. भाड्याने घरात राहणारे भाडोत्री मालक होऊ शकत नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर यांना आम्ही नेस्तनाबूत करू, आगामी येणार्‍या सर्व निवडणुका आपण बहुमताने जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा समन्वयक किशोर जैन म्हणाले की आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मातोश्रीच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहेत, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार येत्या काळात उद्ध्वस्त होतीलच, पण यांना साथ देणारी भारतीय जनता पार्टीदेखील नेस्तनाबूत होईल.

या मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सहसंपर्क प्रमुख तथा ज्येष्ठ सल्लागार किशोर जैन, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, जिल्हा समनव्यक, महिला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, नरेश गावंड, जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे, पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, मुंबई नगरसेवक दत्ता पोंगडे, दिनेश चिले, किशोर खरीवले, पाली शहर प्रमुख ओंकार खोडागळे, विनेश सितापराव, किरण पिंपळे, निखिल खामकर, उपजिल्हा संघटिका आश्‍विनी रुईकर, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, शिहू विभाग संघटिका प्रणाली कोळी, जिल्हा युवा अधिकारी धन्वंतरी दाभाडे, प्रणिता पत्की, संपर्क संघटिका महानंदा तांडेल, हेमांगी बंगाल, किशोर दिघे, उपतालुका प्रमुख रवींद्र खंडागळे, युवा सेना जिल्हाधिकारी सचिन डोबळे, निलेश अवसरे, विद्देश आचार्य आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version