रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक

ध्वजपूजन, पालखी, शोभायात्रांनी रंगणार सोहळा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

| रायगड | प्रतिनिधी |

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच गुरुवारी (दि.20) किल्ले रायगड छत्रपती शिवरायांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 6 जूनला तारखेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनासारखीच जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दुर्गराज सेवा समिती व कोकणकडा मित्र मंडळाच्यावतीने रायगड किल्ल्यावर दरवर्षी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावर्षी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासह रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित राहणार आहेत. रायगड किल्ल्यावर गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ध्वजपूजन केले जाणार आहे. सात वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होईल. आठ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण व नऊ वाजता मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडेल. दहा वाजता शाही शोभायात्रा काढली जाणार असून, अकरा वाजता महाप्रसाद आणि त्यानंतर गड स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून, महाडकडून रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांकरिता कोंझर, वाडा, वाळसुरे, अक्षय कन्स्ट्रक्शनच्या मोकळ्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था केली आहे, तर माणगाव बाजूकडून येणाऱ्या वाहनांकरिता कवळीचा माळ, सोमजाई मंदिर व शिवसृष्टीची जागा या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
आरोग्य पथकांसह बसची सुविधा
गडावर येणाऱ्या शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये, याकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य व्यवस्था तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पार्किंगच्या ठिकाणाहून रायगड पायथा व रोप-वेपर्यंत एसटी बसची सुविधा आहे. सहा जूनला झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांप्रमाणे यावेळीही सुविधा करण्यात आल्या आहेत.
पायवाटेवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोप-वे सुविधा असली तरी अनेक शिवप्रेमी पायरी मार्गाने गडावर जातात. गडावर जाण्यासाठी 1400 पायऱ्या असून, पावसामुळे अनेक ठिकाणी पायरी मार्ग निसरडा झाला आहे. तर, पायवाटेवरती एका बाजूला दरी, तर दुसरीकडे उंच कडे आहेत. या कड्यावरून दगड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या शिवप्रेमींनी गड चढ-उतार करताना काळजी घेऊनच मार्गक्रमण करावे व कार्यक्रमस्थळी येताना सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Exit mobile version