| मुंबई | प्रतिनिधी |
क्रिकेट जगताला सर्वाधिक 21 कसोटीपटू देणारे मुंबई क्रिकेटचे मंदिर असलेल्या ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखान्याच्या भव्यदिव्य नव्या वास्तूच्या निमित्ताने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या या हस्ते नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शिवाजी पार्क जिमखान्याची राजेशाही थाटात उभी राहिलेली वास्तू पाहून आज क्रिकेटप्रेमींचे मन अक्षरशः भारावून गेले होते.
ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचे संगम लाभलेल्या या जिमखान्याचा नव्या वास्तूचे दिमाखात सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, क्रिकेटपटू पारस म्हांब्रेसह जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, कार्याध्यक्ष दीपक मुरकर, सचिव संजीव खानोलकर, संयुक्त सचिव सुनील रामचंद्रन, विश्वस्त लता देसाईंसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन तेंडुलकरने जिमखाना व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले. तो पुढे म्हणाला की, मला सर्वाधिक आनंद याचा आहे की इथे नव्या जिमखान्यात महिलांसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम बांधण्यात आले आहे. मुंबई क्रिकेटमध्ये फार कमी जिमखान्यांकडे अशी सोय आहे. महिला क्रिकेट झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक जिमखान्याने अशी व्यवस्था करावी, असे आवाहनही सचिनने याप्रसंगी सर्व क्रिकेट क्लब आणि जिमखान्यांना केले आहे. महिला क्रिकेटसाठी जिमखान्याने घेतलेल्या पुढाकाराचा मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. तसेच, शिवाजी पार्क जिमखान्याचा हा पहिला अध्याय सुरू झाला आहे. येथील सुविधा मुला-मुलींनी पूर्णपणे वापरून घ्याव्यात, मेहनत घ्यावी आणि जिमखान्यााह मुंबई व भारताचे नाव उज्ज्वल करावे, हीच माझी खेळाडू म्हणून इच्छा असल्याचेही सचिन म्हणाला.
जिमखान्याच्या नव्याने झळाळी लाभलेल्या वास्तू निर्मितीनंतर व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. महिला क्रिकेटपटूंना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचे जिमखान्याचे ध्येय असल्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांनी सांगितले. नवीन जिमखान्याला ‘विम्बल्डन ग्रीन व बेज’ रंग देण्यात आला असून, लवकरच महिला क्रिकेट संघही स्थापन करण्याची योजना असल्याचे सांगितले.






