| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या दीड वर्षांपासून पुनर्बांधणीच्या कामामुळे बंद असलेला दादर येथील शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. या जिमखान्याला हेरिटेज लूक देण्यात आले असून त्याचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.22) लोकार्पण होणार आहे.
1909 साली हा जिमखाना सुरू झाला होता. त्यावेळेस त्याचे नाव ‘दादर हिंदू जिमखाना’ असे होते. पुढे ‘माहीम पार्क’चे नाव शिवाजी पार्क झाल्यानंतर या जिमखान्याचे नाव ‘शिवाजी पार्क जिमखाना’ झाले. या जिमखान्याने अनेक खेळाडू घडताना पाहिले. विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, अजित वाडेकर, संदीप पाटील अशा अनेक खेळाडूंना जवळून पहिले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या या जिमखान्याची पुनर्बांधणी करताना नवीन पिढीच्या अपेक्षेला साजेसे जिमखान्याचे रुपडे आणि सुखसोयी असाव्यात यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल प्रवेश प्रणाली, अत्याधुनिक जिम, स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग, नवे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकर्षण इंटीरिअर करण्यात आले आहे. जिमखान्याचा चेहरामोहरा बदलला तरी आत्मा तोच आहे, असे जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे यांनी सांगितले.






