शिवशक्ती, राजमाता जिजाऊ अंतिम फेरीत

सतेज करंडक कबड्डी स्पर्धा

। पुणे(बालेवाडी) । प्रतिनिधी ।

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन बाणेर आयोेजित करण्यात आलेल्या पुणे लीग व राज्य स्तरीय पुरुष व महिला सतेज करंडक कबड्डी स्पर्धेच्या महिलांच्या पहिल्या उपात्य फेरीच्या सामन्यात मुबंईच्या शिवशक्ती संघाने महेशदादा स्पोर्टस् संघावर 27-20 अशी मात करीत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.
मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे 12-9 आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या पुजा यादव हिने अत्यंत वेगवान खेळ करीत चढाई मध्ये 13 गुण मिळविले. तर पोर्णिमा जेधे हिने 3 व रेखा सावंत हिने 3 गुण पकडी घेत आपल्या विजयात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. महेशदादा स्पोर्टस् संघाच्या मानसी रोडे हिने शर्तीची लढत देत विजयासाठी प्रयत्न केले. तीने चढाईत 11 गुण मिळविले. दिपाली काजळे हिने 4 पकडी घेतल्या तर माहेश्‍वरी वाघ हिने 3 पकडी करीत गुण मिळविले.

महिलांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने महात्मा गांधी संघावर 37-10 गुणांनी दमदणीत विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे 23-7 गुणांची आघाडी होती. राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकर हिने चढाईत 10 गुण मिळविले. सलोनी गजमल हिने जोरदार चढाया करीत 10 गुण मिळविले. अंकिता जगताप हिने 5 पकडी व कोमल आवळे हिने 3 पकडी घेत आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून देण्यात हातभार लावला. महात्मा गांधी संघाच्या सायली जाधव हिने चढाईत 3 गुण व साक्षी काळे हिने 2 गुण मिळविले.

Exit mobile version