शिवकालीन मोरबा देवी देवस्थान

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड जंजिरा तालुक्यातील अन्य देवस्थानांबरोबरच येथील मोरे गावच्या नव्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिरातील मोरबा देवीही मुरुडला भेट देणार्‍या पर्यटकांसह अन्य भाविक भक्तांचेही ते एक आकर्षण ठरते आहे.

मोरबा देवीचे मंदिर हे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे शिवकालीन आहे. कारण जुन्या मंदीराच्या जागी नवीन मंदिर बांधतांना करण्यात आलेल्या खोदकामात ग्रामस्थांना काही शिवकालीन मुद्रा सापडल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर शिवकालीन असल्याची खात्री पटते. मजगाव गावाच्या सुमारे दोन कि.मी.अंतरावर गेल्यास टहाळदेव खिंड रस्त्याच्या उजवीकडे मोरे गावाला जाणारा रस्ता लागतो. मोरे गावाच्या एस.टी बस थांब्याजवळून दोन रस्ते फुटतात त्यापैकी डावीकडील रस्त्याने तीन चार कि.मी आत गेल्यावर मोरे गावाच्या पश्‍चिमेला एका टेकाडावर हे मंदिर उभे आहे.

मंदिराच्या आसपासचा परिसर हा पूर्वी खडकाळ होता. छोट्याशा मंदिरात जाण्यासाठी अवघड पाऊलवाटेने खडक ओलांडून जावे लागत होते. ग्रामस्थांसह यशवंतनगर पंचक्रोशीतील अनेकजण मोरबा देवीची मूर्ती पाषाण रुपी असली तरीही तिची नित्य पूजाअर्चा करीत असत. एवढेच नव्हे तर नवरात्रोत्सवात ही या मंदिरात भाविकांची सतत वर्दळ असायची.

मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज लक्षात घेऊन मोरे गावचे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील दानशूर भाविकांनी केलेल्या उदार हस्ते मदतीतून काही महिन्यांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या कामी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. मंदिरातील देवीची मूर्ती आता संगमरवरी दगडापासून बनवलेली असली तरी पुरातन पाषाण मूर्तीही मंदिरात ठेवण्यात आली आहे.

मोरे गावच्या महिला, पुरुष, छोटी मंडळी या नवरात्रोत्सवात आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम करीत आहेत. तर मुरुड तालुक्यासह अन्य भागातील भाविक मंदिराला भेट देऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत.

Exit mobile version