। नेरळ । वार्ताहर ।
शिवकालीन पळसाई देवीचे मंदिर हे पळसदरी गावाच्या मागे असलेल्या जंगलभागात असुन मंदिराच्या आजूबाजूला असलेली झाडे यामुळे सतत सावली असते. त्यामुळे तेथील निसर्गसौंदर्य पाहाण्यासारखे आहे. त्यात पावसाळ्यात धबधबे तसेच तलावामुळे येणारे पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे ग्रामस्थाना पर्यटनावर आधारीत व्यवसाय मिळाल्याने उत्पनात वाढ झाली आहे. देवीच्या कृपेने गावात समृध्दी व शातंता आहे, अशी ग्रामस्थाची धारणा आहे.
माता पळसदरीची ग्रामदेवता असून सर्व समाजबांधव मोठ्या भक्तीभावाने पुजाअर्चा करीत असतात. पळसदरी परीसरातील आदीवासी ठाकुर कातकरी सर्व हिंन्दुधर्मीयांची ग्रामदेवता म्हणून पळसाची देवी प्रसिद्ध आहे. सुमारे 500 वर्षापुर्वीची सुबक मुर्ती असून पुर्ण शेंदुराने भरली होती. एका भक्ताने शेंदुर काढण्याचा प्रयत्न केला असता शेदुंराच्या आतमध्ये सुबक मुर्ती असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांनी शेंदुर काढल्याने आजचे देवी रुप दिसून येत आहे.
सदर देवी शिवकालीन असल्याने त्याकाळात यौवनाने मोडतोड केल्याने मंदिराचे मागील बाजुस आजही खाणाखुणा दिसुन येतात. पळसदरी गाव सह्याद्रीच्या कुशित दोन डोंगराच्या मध्ये दरीत वसल्याने व विपुल प्रमाणात पळसाची संपत्ती असल्याने काही लोक पुर्वी पञावळीचा देखील व्यवसाय करीत असत. देवीच्या मुखासमोरील डोंगर शिवकालीन शिवनेरी किल्ला म्हणुन ओळखला जातो. सदर किल्ल्यावर पुरातन खाणाखुणा दिसुन येतात. सन 1990 साला पासुन नवरात्रउत्सव मंडळाचे वतीने रासगरबा, जागरगोंधळ, होमहवन, भजन होत आहे. सन 2012-13साली ग्रामस्थानी मंदिराचा जिर्णोद्वार केला. वैशाख शुध्द पंचमीला भव्य पालखी सोहळा उत्सव साजरा होत असतो. नवसाला पावणारी देवी म्हणुन देवीची ख्याती आहे अनेक भाविक नवस फेडण्या करीता येत असतात.