शिवनेरी बसची टँकरला धडक; चालकासह तीन प्रवासी जखमी

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी (दि.17) दुपारी एका शिवनेरी  बसचा टायर फुटल्याने तिने समोरील चालणार्‍या केमिकलच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक बसमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. तर, अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावरून शिवनेरी बस मुंबईहुन पुण्याकडे जात होती. ती खालापूर टोल नाक्याजवळ ओव्हरटेक करत असताना बसचा टायर फुटला आणि त्‍या बसने समोरील केमिकलने भरलेल्या टँकरला जोरदार धडक दिली. या टँकरमध्ये एचसीएल नावाचे अ‍ॅसीड होते. बसच्या धडकेत टँकरमधील केमिकलची गळती झाली होते. तसेच, या बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, महामार्ग बोरघाट पोलीस चौकीचे पाटील, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत, यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, महामार्ग टीम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बसमधील अडकलेल्या प्रवाशांसह केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्‍यानंतर केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना तात्काळ बोलावून टँकरमधील केमिकल गळतीवर नियंत्रण आणण्यात आले. त्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघात कोणतिही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

Exit mobile version