| सोगांव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील घाडी बंधु पुरस्कृत मुनवली चषक 2023 च्या क्रिकेटच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 16 नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना शिवसाई मापगांव संघ व दादरेश्वर जांभुळपाडा संघामध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत शिवसाई मापगांव संघाने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला तर दादरेश्वर जांभुळपाडा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून दादरेश्वर जांभुळपाडा संघाचा जयेश पाटील याने पटकावले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शिवसाई मापगांव संघाचा अक्षय खोत याने पटकावले, तसेच उत्कृष्ट मालिकावीर म्हणून शिवसाई मापगांव संघाचा हितेश राऊत याला गौरविण्यात आले. बक्षीस समारंभात प्रथम क्रमांक रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे व जगदीश बारे यांच्याहस्ते देण्यात आले, तर द्वितीय क्रमांक सामाजिक कार्यकर्त्या संगिता मल्हार व सर्व महिला वर्गाच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मापगांंव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, संजय शिंदे, तंटामुक्ती उपाध्यक्ष विवेक जोशी, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, प्रकाश वडे व इतर मान्यवरांसह मुनवली महिला मंडळ तसेच मुनवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धांसाठी मंडप व डिजेचे नियोजन संजय अनमाने यांनी केले, तसेच स्पर्धेत सूत्रसंचालन अजित हरवडे सर व नदीम वाकनिस यांनी उत्तमरीत्या करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शिवसाई मापगांव संघाने सलग तीन सामन्यात तिसर्यांदा विजेतेपद पटकविल्याबद्दल सर्व मान्यवरांनी व क्रिकेटप्रेमीं नागरिकांनी संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.