शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे बंडखोर आमदारांबद्दल म्हणाले….

काल आलेल्या पाहुण्यांनी घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु नये
। अलिबाग । प्रतिनिधी ।
बंडखोर आ. महेंद्र दळवी म्हणजे काल आलेले पाहुणे आहेत. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत आलेल्या दळवींनी पाहुण्यासारखे रहावे, घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु नये, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.

बंडखोर आ. महेंद्र दळवी यांच्या बगलबच्चांनी कोर्लईत केलेल्या अनेक अवैध कामांचा सरपंच प्रशांत मिसाळ यांनी पर्दाफाश केला. ग्रामस्थांनीही न घाबरता समोर येऊन आरोप करीत बंडखोरांच्या समर्थकांना तोडीस उत्तर दिले. याबाबत सुरेंद्र म्हात्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बंडखोरांबद्दल सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेली माहिती खरी आहे. कृषीवलने अन्यायाविरोधात आवाज उठविला असल्याचे सांगत वृत्तपत्र जाळण्याचा कारनामा बंडखोरांच्या समर्थकांनी केल्याचा जाहिर निषेधही त्यांनी व्यक्त केला.

यापुढे बोलताना ते म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांनी मेहनतीने शिवसेना उभी केली. बाळासाहेबांची विचारधार आजही कट्टर शिवसैनिकाच्या मनात आहे. गद्दारांसोबत गेले ते खरे शिवसैनिक नाहीत. आमच्या शिवसेनेची ताकद बंडखोरांच्या गटाला दाखवून देऊ. आगामी निवडणूकीत जनताच त्यांना त्यांची खरी जागा दाखवेल.

बंडखोरी करुन जिल्ह्याचा विकास करण्याची खोटी स्वप्न दाखविणार्‍यांना येत्या निवडणूकीत जनता उत्तर देईल. बंडखोरी आणि उठाव या मधला फरकही त्यांना समजत नाही. पळपुट्या वृत्तीतून स्थापन केलेली सत्ता ही बंडखोरीच आहे.

जिल्हा प्रमुख निवडण्याचा अधिकार कोणाला?
पक्षाचा जिल्हा प्रमुख निवडण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांना असतो. बंडखोरांचा पक्ष कुठे आहे? त्यांचा पक्ष प्रमुख कोण? त्यामुळे रायगड जिल्ह्यात त्यांनी प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या त्यांच्या समर्थकांना जनता महत्व देत नाही. शिंदे गटाला महत्व देण्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गरज नाही. कारण कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे साहेबांसोबतच आहेत. बंडखोरांनी काहीही केले तरी शिवसेनेत फुट पाडू शकणार नाहीत.

Exit mobile version