शरद पवारांच्या बैठकिला शिवसेनेचे नेते गैरहजर

महाविकार आघाडीतून शिवसेना बाहेर?
। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या तिसर्‍या मंचाच्या बैठकीमुळं राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील महत्वाच्या पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना मात्र या बैठकिचं आमंत्रण नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. देशातील अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळं भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर खुलासा केला आहे.

शरद पवारांच्या सहा जनपथ येथील निवासस्थानी आज एक बैठक होत आहे. देशातील महत्त्वाचे नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व पत्रकार या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्यात सध्या राष्ट्रवादी सोबत असलेल्या शिवसेनेला या बैठकीचं निमंत्रण नाही. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांच्या बैठकीला शिवसेनेचं कोणीही उपस्थित राहणार नसल्यानं उलटसुलट चर्चा होत आहे. मात्र, राऊत यांनी या तर्कवितर्कांना काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांनी बोलावलेली बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाही. माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचाच्या नेत्यांची आहे. या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष, तेलंगण राष्ट्र समिती यापैकी कोणीही जाणार नाही. ही राष्ट्र मंचापुरती मर्यादित बैठक आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनी तिथं जाण्याचा प्रश्‍नच येत नाही,फ असं राऊत म्हणाले.

शरद पवार हे मोठे नेते आहेत. अनेक क्षेत्रातील लोक त्यांचा सल्ला घेत असतात. आजची बैठक ही राष्ट्र मंचची आहे. त्यांना काही मुद्द्यांवर पवारांशी चर्चा करायची आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे असं म्हणता येईल. पण त्याला मोदी विरोध, भाजप विरोध असं म्हणणं चुकीचं आहे, असंही राऊत म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीला यशवंत सिन्हा यांच्यासह पवन वर्मा, संजय सिंह, डी. राजा, फारूख अब्दुल्ला, न्या. ए. पी. सिंह, जावेद अख्तर, केटीएस तुलसी, करण थापर, आशुतोष, अ‍ॅड. माजिद मेमन, खासदार वंदना चव्हाण, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंग, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, कॉलिन गोन्सालवीस, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version