| माथेरान | वार्ताहर |
रुबाबदार घोड्यावर स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान केलेला युवक आणि त्याच्या साथीला मावळ्यांचे वेष परिधान केलेले तरुण, बालशिवाजी सुध्दा बनलेला बालक, ढोल ताशांच्या गजरात, झांज पथक, लाठीकाठी, लेझीम, दांडपट्टा, मल्लखांब कवायत करणारे लहान-मोठे युवक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाड्याचा स्पीकरमधून निघणारा अंगावर रोमांच उभे करणारा भरदार आवाज, फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी कागदी पताकांची पुष्पवृष्टी, महाराजांच्या पुतळ्याची शिवशाही थाटात काढण्यात आलेली पालखी ही दृश्ये शिवकालीन युगात नेल्याप्रमाणे भासत होती. जणूकाही माथेरानमध्ये शिवशाही अवतरली आहे की काय असाच भास यानिमित्ताने होत होता.
हा भव्यदिव्य नयनरम्य सोहळा डोळ्यात आणि आपल्या मोबाईल कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांचे मोबाईल सज्ज झाले होते. या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सुध्दा साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांनसह गावातील महिला वर्गासह आबालवृद्ध मंडळी आवर्जून उपस्थित होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतियेच्या शुभमुहूर्तावर माथेरानमध्ये अनेक वर्षांपासून याच दिवशी शिवजयंती साजरी केली जाते.
श्रीराम चौकात भव्य सभामंडप उभारून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याची सकाळी अकरा वाजता माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या पुतळ्याला शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केला. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुतळ्याला महिला संघटक संगीता जांभळे यांच्या हस्ते पुष्पहार, स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास उप शहरप्रमुख प्रमोद नायक, प्रकाश सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रमजान ईद आणि शिवजयंती हे दोन्हीही सण एकाच दिवशी आल्याने समस्त मुस्लिम बंधू भगिनींनी सुध्दा आवर्जून या मिरवणुकीत हजेरी लावून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले तर मुस्लिम समाजातील समीर पन्हाळकर या तरुणाने भगवे कपडे परिधान करून भगवा झेंडा हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेना, युवती सेना,महिला आघाडी,त्याचप्रमाणे सेनेचे आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.