| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व अभियानांतर्गत’ सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन 17 सप्टेंबर पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवाडा राज्यभर राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करून पारदर्शक व जवाबदार प्रशासन उभारणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत कामकाज तीन महत्त्वाच्या टप्प्यांत पार पाडले जाणार आहे.
पहिला टप्पा :
पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांक देणे, नोंदी व मोजणी.
दुसरा टप्पा :
सर्वांसाठी घरे योजनेसाठी उपलब्ध सरकारी जमीन कब्जेहक्काने वाटप, अतिक्रमणे नियमित करणे व पात्र लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करणे.
तिसरा टप्पा:
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गरजेनुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शिवार फेरीचे आयोजन
या अभियानाचा भाग म्हणून नागाव व चौल मंडळातील सर्व सजेतील महसुली गावांमध्ये शिवार फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी गावपातळीवरील समस्या ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यावर भर देण्यात आला आहे.
लोकांच्या सेवेसाठी प्रशासन तत्पर
शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, सेवा पंधरवाडा हा शासन व जनतेतील संवाद अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.







