| माजलगाव | प्रतिनिधी |
शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या प्रश्नावर सातत्याने लढणाऱ्या तसेच मार्क्सवाद आणि सत्यशोधक विचारधारा केंद्रस्थानी ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा अधिवेशन माजलगाव येथे रविवारी (दि.11) संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात बळीराजा व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तर, सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव गोळेगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना बाबासाहेब देवकर यांनी, शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. तर, उमाकांत राठोड यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपला विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच, दिगंबर कांबळे यांनी बीड जिल्ह्याला डाव्या विचारांचा खूप मोठा वारसा असल्याचे सांगून क्रांतिसिंह नाना पाटलांचा विचार पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर विष्णुपंत घोलप यांनी शेतकरी कामगार पक्ष एकजुटीने काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढा उभारण्याचा विश्वास दिला. तर, भाई मोहन गुंड यांनी पुन्हा एकदा बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला करण्यासाठी कामाला लागण्याची आव्हान केले.
अधिवेशनाच्या शेवटी एकमताने कार्यकारणी निवडण्यात आली. त्यात जिल्हा चिटणीसपदी ॲड.नारायण गोले पाटील (पुर्व), बापुसाहेब साळुंके (पश्चिम), तर संघटकपदी धनंजय मुळे, खजिनदार अशोक रोडे, माऊली जाधव, परळी मुंजा पांचाळ, माजलगाव राहुल सोळंके, माजलगाव अनिल कदम, वडवणी नवनाथ जाधव, आंबेजोगाई महिला आघाडीच्या समन्वयक शिवकन्या मोहन गुंड व तेजस्विनी उबाळे यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी विष्णुपंत घोलप, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेकापचे सहचिटणीस बाबासाहेब देवकर, पाहुणे म्हणून कार्यालयीन सहचिटणीस प्रा. डॉ. उमाकांत राठोड, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.डॉ. चंद्रकांत चव्हाण, रस्ते महामार्ग बाधित शेतकरी कामगार आघाडीचे राज्याध्यक्ष दिगांबर कांबळे, राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य मोहन गुंड, मध्यवर्ती समिती सदस्य शिवाजीराव सुरवसे व इम्रान शेख यांची उपस्थिती होती.







