जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

माजी आ. बाळाराम पाटील यांची मागणी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. योगेश प्रकाश भस्मे यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे आता या बदलीच्या व्यवहारामागे नेमके कोण होते, भस्मे यांनी ही रक्कम कोणाच्या सांगण्यावरून मागितली होती का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी मागितलेली दीड लाखांची रक्कम नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर घेतली? हा प्रश्न आता रायगड जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, वित्त विभागातील कर्मचारी असलेल्या भस्मे यांच्याकडे अध्यक्षांचे स्वीय सचिव म्हणून जबाबदारी होती. त्यामुळे शिक्षिका बदली प्रकरणात वित्त विभागातील कर्मचाऱ्याचा प्रवेश नेमका कसा झाला? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. लाच स्वीकारताना भस्मे रंगेहाथ पकडले गेले असले तरी या व्यवहाराची व्याप्ती केवळ एका व्यक्तीपुरतीच होती का? लाचेची मागणी करण्यामागे कोणाची भूमिका होती? व्यवहाराबाबत कोणाशी संपर्क झाला होता का? या सर्व बाबींची चौकशी झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. एसीबीच्या कारवाईनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे मागितलेली दीड लाखांची रक्कम नेमकी कोणासाठी होती? भस्मे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ही रक्कम मागितली होती की या व्यवहारामागे आणखी कोणी व्यक्ती होती, हे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

या प्रकरणातील संबंधित शिक्षिकेच्या बदलीचा अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित होता, त्यावर कोणत्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी किंवा शिफारस आवश्यक होती आणि या संपूर्ण प्रक्रियेत भस्मे यांचा प्रत्यक्ष संबंध कसा आला, याचाही तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निःपक्षपातीपणे चौकशी करा
जि.प. अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला लाच घेताना पकडले जाणे ही गंभीर बाब आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा परिषद अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर दीड लाखांची लाच नेमकी कोणासाठी मागितली होती? बदलीच्या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता का? स्वीय सचिवाला संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करण्याची भूमिका कोणी दिली? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. शिक्षिका बदलीचा विषय हा प्रशासनाच्या संबंधित विभागाशी निगडित असताना अध्यक्षांच्या स्वीय सचिवाची त्यामध्ये नेमकी भूमिका काय होती, याची चौकशी करण्याची मागणीही बाळाराम पाटील यांनी केली. एसीबीच्या कारवाईनंतर आता केवळ लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार की या व्यवहारामागील संभाव्य साखळीचाही तपास होणार, याकडे लक्ष लागले आहे.
बदली प्रक्रियेचीही चौकशी करा?
या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. संबंधित बदलीचा अर्ज, त्यावरील नोंदी, पत्रव्यवहार, फाईलची हालचाल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी झालेला पत्रव्यवहार यांची तपासणी झाल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात.
एसीबीला भस्मे यांच्याकडून मिळालेली माहिती, संबंधित कागदपत्रे आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात असल्याने या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कारवाईने अनेक प्रश्न ऐरणीवर 
या कारवाईने केवळ एका कर्मचाऱ्यावरील लाचप्रकरण समोर आले नसून, जिल्हा परिषदेत प्रशासकीय निर्णयप्रक्रिया नेमकी कशी चालते, लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांची भूमिका किती असते आणि बदलीसारख्या संवेदनशील विषयांमध्ये अनधिकृत हस्तक्षेप होतो का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील. दीड लाखांच्या लाचेचा हा व्यवहार केवळ भस्मेपुरता मर्यादित आहे की त्यामागे आणखी काही दुवे आहेत, याचा उलगडा आता एसीबीच्या तपासातून होणार आहे.
Exit mobile version