अजित पवार गटाला धक्का! शेडसई ग्रामपंचायतीमध्ये राजकिय भूकंप

उपसरपंच प्राजक्ता कडूंचे सदस्यत्व रद्द; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत राहिली आहे. लक्ष्मीखार बसस्टँड असो की शेडसई अंगणवाडी इमारत, तसेच घरकुळ प्रतिक्षेची ‌‘ड’ यादीवरील स्थगिती आणि यानंतर अविश्वास ठराव, अशा अनेक विषयांतून ग्रामपंचायतीची निवडणूक 2021मध्ये झाल्यापासून चर्चेत आली आहे. त्यातच गोफण गावचे युवा नेतृत्व समाजसेवक दिनेश पांडुरंग कडू यांनी एप्रिल 2021 रोजी केलेल्या तक्रारी अर्जानुसार ग्रामपंचायत शेडसईच्या उपसरपंचांचे सदस्यपद रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांनी दिल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

हा आदेश जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्र.3 चे कलम 14 फ चे तसेच कक्षअधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील दि. 29/07/2023 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता प्राजक्ता प्रभाकर कडू, उपसरपंच ग्रामपंचायत शेडसई ह्या दि.10/02/2021 ते दि. 27/09/2022 पर्यंत ग्रामपंचायत शेडसई येथे सदस्य व उपसरपंच तसेच केंद्रचालक या दोन्ही पदाचा उपभोग घेतल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली, असा आदेश दिले आहे. तसेच प्राजक्ता प्रभाकर कडू यांनी ग्रामपंचायत शेडसई येथे सदस्य व उपसरपंच तसेच केंद्रचालक या दोन्ही पदाचा उपभोग घेतल्याचे स्पष्ट झाल्याने प्राजक्ता कडू यांचे सदस्य व उपसरपंच पद रद्द करणे ही न्यायीक बाब असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी तसा आदेश सोमवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दिला आहे. त्यानुसार प्राजक्ता कडू यांचे सदस्यत्व रद्द झाले असल्याची माहिती व ते पत्रक दिनेश पांडुरंग कडू यांनी दिली आहे.

Exit mobile version