| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेला बहुप्रतिक्षीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम गुरुवारी (दि.14) पुण्यात पार पडला. अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अखेर शरद पवार गटात घरवापसी केली. यावेळी शरद पवार, निलेश लंके आणि जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार हे सध्याच्या काळात किती मेहनत करत आहेत, याचा पाढा वाचला. काल शरद पवार निफाडच्या सभेसाठी नाशिकला गेले होते. त्यानंतर ते रात्री दीड वाजेपर्यंत जळगावातून येणाऱ्या प्रत्येकाला भेटत होते. सकाळी पुन्हा आठ वाजता ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर थोडीही विश्रांती न घेता शरद पवार आता इकडे आले आहेत. त्यांचा हा अथक काम करण्याचा स्वभाव सगळ्यांना प्रेरणा देणार आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
निलेश लंके हा संकटाच्या काळात धावून येणारा नेता: जयंत पाटील जयंत पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांनी यापुढे शरद पवारांच्या विचारांसोबत चालायचे ठरवले आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी लंके यांचे कौतुकही केले. मागच्या काळात निलेश लंके आणि आमची भेट होत नव्हती. आज आमची जिव्हाळ्याने आणि प्रेमाने भेट झाली आहे. निलेश लंके नगरमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. ते सामान्यांना आपला वाटणारा नेता आहेत. संकटाच्या काळात धावून येणारा नेता ही त्यांची ओळख आहे. ते आज शरद पवारांना भेटायला आले आणि त्यांनी इथून पुढे शरद पवार साहेबांच्या विचारधारेने चालण्याचा निर्णय घेतल आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
