स्कूल बसमधल्या क्लिनरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात बदलापूरसारखी घटनेची पुनरावृत्ती झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत.
कर्जत तालुक्यातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दखल केला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. करण दीपक पाटील (24) असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, करणने केलेल्या कृत्याबद्दल त्या पिडीत मुलींनी आपल्या पालकांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करायचा. तसेच, त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाणही करत. त्यामुळे घाबरुन त्या चिमुकल्या सारं काही सहन करीत होत्या. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले आहे. आपल्या मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याने पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला आहे.
दरम्यान, स्कूल बस मालकाचीसुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी पालक करत आहेत. तसेच, या प्रकरणातील आरोपी करण पाटील यांच्यासह ज्यांचा-ज्यांचा या प्रकरणाशी संबध असेल त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितांच्या नातेवाईकांनी केली आहे. यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार घडला होता. आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.