धक्कादायक! 75 वर्षीय आईचे मुलाविरुद्ध उपोषण

| नेरळ | प्रतिनिधी |

पतीने खरेदी केलेल्या जमीन मिळकतीमधील हिस्सा आपल्या दुसऱ्या लेकरालाही समान मिळावा, यासाठी कशेळे येथील 75 वर्षीय महिला आपल्या मोठ्या मुलाच्या विरोधातच उपोषणाला बसणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रकांता गोर गुरुवारी (दि.4) उपोषणाला बसणार असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील लक्ष्मीचंद दामोदर गोर यांनी सुमारे वीस वर्षापूर्वी जमीन खरेदी केली होती. त्यांनी ही जामीन मोठ्या मुलाचे नावे करून दोन्ही मुलांनी ती समान वाटून घ्यावी, असे सुचविले होते. लक्षमीचंद्र गोर यांचा 2006 साली मृत्यू झाला आणि त्यानंतर लक्ष्मीचंद्र गोर यांच्या मोठ्या मुलाने वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीचा समान वाटा आपल्या सख्ख्या भावाला देण्यास नकार दिला. त्यानंतर लक्ष्मीचंद्र गोर यांच्या पत्नी चंद्रकांता गोर यांनी आपल्या दोन्ही मुलांना पतीने खरेदी केलेल्या जमिनीमधील वाटा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा मोठा मुलगा वडिलोपार्जित जमीन लहान भावास देण्यास तयार नाही. परिणामी या कुटुंबातील वाद विकोपाला गेला असून 75 वर्षीय चंद्रकांता गोर यांनी आपल्या एका मुलाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या मुलाविरोधात उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांता गोर यांचे वय लक्षात घेता प्रशासनाने या विषयात महत्वाची भूमिका घ्यावी, अशी मागणी कशेळे ग्रामस्थांची केली आहे. तसेच, चंद्रकांता गोर यांना मधुमेह, रक्तदाब तसेच अन्य आजार असल्यामुळे हे उपोषण त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे कर्जत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने उपोषणापूर्वी मार्ग काढावा, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version