धक्कादायक! चालत्या एसटीचे चाक निखळले

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले

| कोर्लई | वार्ताहर |

अलिबागहून मुरुडकडे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या चालत्या एसटी बसचे चाक निखळले, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कारण, त्या एसटी बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्‍या मुरुड आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

मुरुडहून बोरीवलीकडे जाणार्‍या एसटी बसचा बिघाड चालकाच्या लक्षात आल्याने अलिबाग येथून परत मुरुडला येत असताना मध्येच खारगल्ली येथे आल्यावर आवाज येत असल्याचे लक्षात येताच चालक संदीप डावखरे यांनी खाली उतरून पाहिले. त्यावेळी चालकास एसटीचे मागील बाजूचे चाक निखळले असल्याचे दिसून आले. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर एसटीमध्ये सत्तर प्रवासी होते. दरम्यान प्रवाशांनी चालकाचे मनोमन आभार मानले. परंतु, या घटनेने मुरुड आगाराचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

मुरुड आगारातून सकाळी 11-30 वाजता सुटलेल्या मुरुड-बोरीवली एसटीतून काही तरी आवाज येत होता म्हणून चालकाने बस अलिबाग आगारात थांबवली. त्याठिकाणी आलेल्या कल्याण-मुरुड गाडीत प्रवासी बसवून बोरिवलीकडे जाण्यासाठी रवाना करण्यात आली, तर कल्याणकडून मुरुडकडे जाणारे गाडीतील प्रवासी घेऊन परतत असताना खारगल्लीनजीक गाडीत जास्त आवाज येत असल्याचे लक्षात येताच चालक संदीप डावखरे यांनी ताबडतोब गाडी थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरविले. गाडीची पाहाणी करण्यासाठी गेले असता मागील बाजूचे चाक निखळले असल्याचे दिसून आले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील अनर्थ व जीवितहानी टळली, त्यामुळे सर्व प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुड आगारातील भंगार गाड्या अनेक वेळा ब्रेक डाऊन होऊन बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.

Exit mobile version