| रायगड | प्रतिनिधी |
महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या टेरेसवरुन पडून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी (20), समर्थ रामदास अपार्टमेंट, महाड ही तरुणी राहत होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया चौधरी ही तरुणी इमारतीमध्ये येणारे बोरींगच्या पाण्याचा जल वहिनीचा कॉक बंद करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. त्यावेळी रिया हिचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली डकमध्ये पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने तिला तातडीनं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, महाड ग्रामीण रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिया चौधरी हिला तपासून मृत घोषित केलं. रिया चौधरी ही इमारतीवरून पडल्यानं तिच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील. अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे. या घटनेची माहिती महाड शहर पोलीस ठाण्यात भावेश मोरे(45), समर्थ रामदास अपार्टमेंट, महाड यांनी दिली असून, याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.







