धक्कादायक! पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात

| पनवेल | प्रतिनिधी |

समाजमाध्यमावरून ओळख झालेल्या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पनवेल परिसरात घडली आहे. याप्रकरणी खान्देश्‍वर पोलिसांनी 18 वर्षीय तरुणावर बलात्कारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच गर्भपात करण्यात सहभागी असलेली तरुणाची आई आणि अन्य दोन नातेवाईकांना सहआरोपी करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाची आणि पीडित मुलगी यांची दोन वर्षांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन तिला आपल्या घरी बोलावून तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ही मुलगी गरोदर राहिली. तिने हे तरुणाला सांगताच त्याने खोटे बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीच्या आईने मे महिन्यात या मुलीला त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे पाठवले. तेथे तरुणाच्या दोन मावशांनी पीडित मुलीचा नांदेड येथील एका रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात करून घेतला. त्यानंतर तिला पुन्हा तिच्या घरी आणून सोडण्यात आले. गत आठवड्यात आपल्या मुलीचा गर्भपात झाल्याचे तिच्या आईला समजले. तिने याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरुण आणि त्याची आई आणि दोन मावशांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version