| बीड | वृत्तसंस्था |
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्र आणि रॉडने प्राणघात हल्ला केला होता. या घटनेत उपजिल्हाप्रमुख गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या पायाला आणि डोक्यावर मारहाण करण्यात आली. याच हल्ल्याप्रकरणी ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून बीडचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह बारा जणांवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. माळस जवळा या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बॅनरवरून गावात दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून कुंडलिक खांडे यांनी ज्ञानेश्वर खांडे यांना कट रचून मारहाण केल्याचा आरोप ज्ञानेश्वर खांडे यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पुण्यातूनच बीड ग्रामीण पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून,
शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात एका तरुणाने बेदम मारहाण केली आहे. माजलगावच्या जाळपोळीत आमची नावं विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली आहे. माजलगावातील रंगोली कॉर्नरवर ही मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण करण्यात आली आहे. माजलगावात भर रस्त्यात सुरु असलेली मारहाण पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.