बारावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू
| सांगली | प्रतिनिधी |
सांगलीतल्या आटपाडीत तालुक्यातील नेलकरंजी येथे एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नीट सराव परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडीलांनी आपल्या 17 वर्षीय मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. धोंडीराम भोसले असे वडीलांचे नाव असून ते पेश्याने शिक्षक आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
धोंडीराम भोसले हे नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर, त्यांची मुलगी साधना ही बारावीत शिकत होती. साधनाला डॉक्टर व्हायचे होते म्हणून तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. ती नीट परीक्षेचा सराव करत होती. साधनाला नीट सराव परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिल धोंडीराम भोसले नाराज होऊन त्यांनी तिच्यावर हात उचलला. तेव्हा साधनाने रागाच्या भरात वडिलांना उलट उत्तर दिले. त्यामुळे भोसले यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आवाज देऊनही साधना उठत नव्हती म्हणून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासात तिला मृत घोषित केले. साधना बाथरुममध्ये पडली असे कारण आधी तिच्या पालकांनी सांगितले. मात्र, तिच्या शरीरावरील जखमांमुळे साधनाला बेदम मारहाण झाल्याचे लक्षात आले आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.







