धक्कादायक! आईस्क्रीम कोनमध्ये आढळला बोटाचा तुकडा

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मालाड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मुंबईतील मालाड भागातील पेशाने डॉक्टर असलेल्या एका महिलेने बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. पण तिने ते खायला सुरुवात केल्यानंतर आतमध्ये कोणतीतरी कडक वस्तू असल्याचे तिला जाणवले. तिने ते बाहेर खेचताच तिला सुमारे 2 सेमी लांब मानवी बोटाचा तुकडा दिसला. तिने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

मालाड पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली असून यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आईस्कीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मालाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version