| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यात निवडणूकीचे वारे जोरदार सुरु आहेत. सर्वत्र उमेदवारांच्या प्रचाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सुरुवात झाली आहे. अशातच उरण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून इच्छूक असणारे माजी आ. मनोहर भोईर यांना बुधवारी (दि.16) रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
2007 मध्ये सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या मनोहर भोईरांवर पोलिसांनी बुधवारी रात्री अटकेची कारवाई केली आहे. त्यांच्यासह तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व पाच कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक वर्षे सुनावणीला हजर न राहिल्याने न्यायालयाने ही शिक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारावर झालेली कारवाई हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या जामिनासाठी ठाकरे गटाची धावपळ सुरु असून त्याबाबतचा अर्ज न्यायालयात दाखल केला असल्याची माहितीही समोर आली आहे.