| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना एक भयंकर घटना घडली आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून ब्लॅकमेल करत 56 वर्षीय नराधमाने 14 वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. अत्याचार करणाऱ्या 56 वर्षांच्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रिकरण करून कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन 56 वर्षीय व्यक्तीनं 14 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ करत कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी देत पीडित मुलीस आरोपीने घाबरवले. ते चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







