धक्कादायक! लोअर परेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईमधील लोअर परेल भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

हा धक्कादायक प्रकार दि. २३ डिसेंबरचा असून, पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींपैकी तीन आरोपी अल्पवयीन असून, एकजण पीडित मुलीचा मित्र असल्याचे समोर आले आहे. याच मित्राने पीडितेला एका मित्राच्या घरी नेले जेथे तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला.

यानंतर पीडितेने ही बाब घरच्यांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे. तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर इतर तीन ओरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. घटनेतील इतर आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version