दोन हजार रुपये उकळण्याचा लाजीरवाणा प्रकार
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणं म्हणजे काय? याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृतदेहाला व्यवस्थित कपडा गुंडाळून देतो, 2000 रुपये द्या.. असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांना लुबाडल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई पालिकेच्या वाशी रुग्णालयात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली होती. या घटनेनंतर तिचा मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात आणण्यात आला. ही तरुणी मुळची कानपूरची आहे. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले. तेथून मृतदेह घेऊन ते गावी जाणार होते. तरुणीच्या मृतदेहाला कपडा व्यवस्थितत गुंडाळून देतो, 2000 रुपये द्या अशी मागणी रुग्णालयातील शवगृहातील कर्मचाऱ्यांनी केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून दोनशे- पाचशे नव्हे तर थेट 2 हजार रुपये अवैधपणे घेतल्याच्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे.






