। चंद्रपूर । वृत्तसंस्था ।
चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आत्महत्या केली आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव या गावातील नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी पल्लवी हिच्यासोबत लग्न झाले असून त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. पल्लवी पारोधे (27) हिने आपल्या मुलाला विष पाजले आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळला तर पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृत पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठवला. तर, मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलावर उपचार सुरु आहेत.
तसेच, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून पैशांसाठी सासरच्या लोकांनी वारंवार त्रास दिल्याची तक्रार पल्लवीच्या वडिलांनी केली आहे. तक्रारीनुसार शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत पल्लवीच्या पती आणि दिराला अटक केली आहे. तसेच, याबाबत अधिक तपास चालू आहे.