धक्कादायक! फक्त बाराशे रुपयांसाठी खून; एक जखमी

कळंबोली वसाहतीमधील प्रकार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

फक्त बाराशे रुपयांसाठी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.14) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली आहे. घटनेत मध्यस्थी करायला गेलेला एक जण जखमी झाला असून, जखमीवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेत मृत्युमुखी पडलेले परवेज अन्सारी आणि आरोपी सद्दामहुसेन अन्सारी हे एकाच ठिकाणी कामाला होते. सुपरवायजर म्हणून काम पाहणाऱ्या परवेज अन्सारी यांच्याकडून सद्दामहुसेन अन्सारी यांना 1 हजार 250 रुपये येणे बाकी होते. वारंवार मागणी करुनदेखील पैसे मिळत नसल्याने सद्दामहुसेन याने शुक्रवारी परवेज अन्सारी याचे घर गाठून पैसे देण्याची मागणी केली. मात्र, परवेज याने पैसे देण्यात असमर्थता दाखवल्याने सद्दामहुसेन आणि त्याच्यासोबत आलेल्या दोघांनी परवेज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. परवेज यांना मारहाण होत असल्याचे लक्षात आल्यावर मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या नातेवाईकांवरदेखील सद्दाम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याकडील चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या परवेज आणि त्याच्या नातेवाईकाला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता परवेज यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version