। पनवेल। वार्ताहर ।
कळंबोली सेक्टर-1 परिसरात दोन दिवसांचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवाशांना रस्त्यालगत एक अर्भक आढळून येताच त्यांनी तत्काळ कळंबोली पोलिसांना ही माहिती दिली. त्यावर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्भकाला जाणीवपूर्वक टाकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकवस्तीत अर्भक आढळल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, येथील रहिवाशांनी या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास कळंबोली पोलीस ठाण्याचे पो. नि. अभयसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस सीसीटीव्ही फूटेज, स्थानिक माहितीदार यांच्यामार्फत करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अर्भकाला कोणी व कोणत्या परिस्थितीत टाकून दिले याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धक्कादायक! कळंबोलीमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले
