| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे अंधश्रद्धेतूनही गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. नवी मुंबईत आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घणसोलीमध्ये घडला आहे. अघोरी कृत्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. नवरा बायकोच्या भांडणांमधून आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
घणसोली इथं आईने आपल्या दोन मुलांचा चाकूने खून केला आणि यानंतर तिने स्वत:ला पंख्याला गळफास घेतला. पण पंखा तुटल्यामुळे आईचा जीव वाचल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आवाज होताच इमारतीतील बाकीचे लोक घरी धावत आले. यानंतर घरात चार वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता तर आईलाही उपचारासाठी वाशीतल्या महानगरपालिका रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. वडील घरी नसल्याचा फायदा घेत आईने हा प्रकार केला.
दरम्यान, मुलाचा 28 ऑक्टोबरलाच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सगळे सुरळीत असतानाही आईने अशा प्रकारचा गंभीर गुन्हा का केला? याबद्दल आता रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.