| मुंबई | प्रतिनिधी |
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी संबंधित संबंधित अनुज थापन या आरोपीने काही दिवसांपूर्वी तुरुंगात आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, अनुज थापन कथित आत्महत्या प्रकरण प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये गळ्याभोवती आवळल्याची चिन्ह दिसत आहेत. ज्यामुळे श्वास गुदमरला गेला असावा. तर मेंदू न्यूरोपॅथॉलॉजीसाठी ठेवून घेतला आहे. अनुजचा व्हीसेरा अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कुटुंबियांनी अनुज थापनचा मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केले. मृतदेह ताब्यात घेऊन विमानाने पंजाबला नेला जाईल. तेथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत अनुजच्या भावाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, मृत अनुज थापनच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे सलमान खानवर कारवाईची मागणी केली आहे. एवढेच नाही तर, मृताच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली आहे. ही आत्महत्या नसून, अनुजच्या मृत्यूमागे षड्यंत्र असल्याचा आरोप थापनचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.