निर्दयी पतीला ठोकल्या बेड्या
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-आडिवलीजवळील रस्त्यावर स्वतःच्या पत्नीवर गोळीबार करणारा निर्दयी पतीला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पती-पत्नीमधील भांडणे विकोपाला गेली. त्यात बायकोन घटस्फोट दिल्याचा राग मनात धरुन तिच्यावर गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि.27) सकाळी साडेनऊ वाजता घडली. त्यानंतर जंगलात पळून गेलेल्या नराधम पतीला कर्जत आणि नेरळ पोलीस यांच्या पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडे असलेली काडतुसाची बंदूकदेखील ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
आवळसजवळील नेवाली येथे असलेल्या कातकरी समाजाच्या वाडीमध्ये राहणारा चंद्रकांत सखाराम वाघमारे याचा धोंडीबाई यांच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला दोन अपत्य असून, त्यांचे मतभेद झाल्याने धोंडीबाई यांनी नवऱ्याला दि.23 रोजी घटस्फोट दिला होता. त्यानंतर त्या आपल्या भावाकडे खंडपे येथे राहून मोलमजुरी करून स्वतःचा चरितार्थ करीत असत. मात्र, आपल्याला सोडचिठ्ठी दिली याचा राग मनात असलेले चंद्रकांत सखाराम वाघमारे याने धोंडीबाई मजुरी करीत असलेल्या ठिकाणी जाऊन दमदाटी करायचा. सोमवारी (दि.27) कर्जत कोंदीवडे रस्त्यावरील आवळस सांगवी गावाच्या मध्ये एका बांधकाम साईटवर धोंडीबाई या आपल्या भावासोबत मजुरीचे काम करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी ॲक्टिवा गाडीवरून आलेल्या चंद्रकांतने आजूबाजूच्या लोकांना काही समजायच्या आत सोबत आणलेल्या ठासणीच्या बंदुकीमधून गोळ्या झाडल्या. त्यातील गोळ्या धोंडीबाई यांच्या शरीराच्या अन्य भागातदेखील गोळ्या लागल्याने त्या त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
कर्जत पोलीस ठाणे येथे चंद्रकांत कातकरी याच्यावर पत्नी धोंडीबाई यांच्या खुनाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कर्जत पोलीस ठाणे येथे मयत महिला धोंडी बाई यांचा भाऊ महादू राघू वाघमारे यांनी आपल्या बहिणीचा खून चंद्रकांत सखाराम वाघमारे याने केला असल्याची तक्रार केली. आवळस नेवाळी येथील कातकरी वाडीमधील चंद्रकांत सखाराम वाघमारे (40) याने पत्नी धोंडिबाई यांच्यावर गोळीबार करून हा तरुण स्वतःची दुचाकी तेथेच टाकून उल्हास नदीमधून जंगलात पळून गेल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे कर्जत पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस उपअधीक्षक ढेळे यांनी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून शोधमोहीम हाती घेतली. त्यात त्या तरुणाकडे बंदूक असल्याने पोलीसदेखील सतर्क होते. हा आरोपी मोहिली गावाकडे पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी पाहिले असल्याने पोलिसांची तपास पथके ही त्याच भागातील जंगलात तपासाच्या दृष्टीने फिरु लागली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घनदाट जंगलात चंद्रकांत हा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि कर्जत पोलीस ठाणे येथे आणले.
पोलीस उपअधीक्षक ढेळे यांच्या मार्गदर्शन खाली कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच पोलीस उपनिरीक्षक सरगर, शिंदे यांच्या जोडीला पोलीस कर्मचारी किसवे, कांबळे, आढरे, केकाण, म्हात्रे, राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास अवघ्या काही तासात लावला. त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अभिनंदन केले आहे.