धक्कादायक! बहिणीसोबत सापडल्याने तरुणाचा खून

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

बहिणीसोबत एकत्र सापडलेल्या एका तरुणाचा खून झाल्याची घटना तळोजा गावात घडली आहे. समीर शेख असे मृत तरुणाचे नाव असून, मुलीचा भाऊ आणि त्याच्या वडिलाने या तरुणाला बेदम मारहाण केली. देवीचा पाडा येथे राहणारा समीर हा रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याची मैत्रीण आलिया शेख हिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. आलियाने स्वतः समीरला भेटण्यासाठी घरी बोलावले होते. यादरम्यान आलियाचा भाऊ ताहीर कामावरुन घरी परत आला. परंतु, आलियाने दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला. काही मिनिटे दरवाजा ठोठावल्यानंतर त्याने दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला.

घरात प्रवेश केल्यावर ताहीरला आलिया व समीर एकत्र दिसल्याने त्याने वडील युसूफ यांना घरी बोलावून घेतले. युसूफ घरी आल्यावर समीरला घरातील लोखंडी फावड्याने बापलेकांनी जबर मारहाण केली. युसूफने लोखंडी कोयत्याने समीरच्या डोक्यात प्रहार केला. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. यादरम्यान समीरला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यावर आलियाच्या घराशेजारी राहणार्‍या समीरच्या काकी मैनाखातुन अली शेख यांनी युसूफ व ताहीरला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही पोटात लाथ मारुन त्यांना खाली पाडण्यात आले. या प्रकरणानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाथ काळदाते यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्येचा गुन्हा युसूफ व ताहीर यांच्यावर नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक रमेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू खाटपे, सतीश गोरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुर्‍हाडे यांनी 45 वर्षीय युसूफ व 24 वर्षीय ताहीरला अटक केली.

Exit mobile version