। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय खेळाडूंनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे.भारताच्या नावावर आता आठ पदके जमा झाली आहेत. नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. चीनच्या चाओ यांगने 237.9 गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्ण जिंकले, तर दुसरा चिनी खेळाडू जिंग हुआंगने 237.5 गुणांसह रौप्यपदक जिंकले. सिंहराजने 216.8 गुणांसह कांस्य जिंकले.
सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये देशाला नेमबाजीत दुसरे पदक मिळाले आहे. यापूर्वी सोमवारी 19 वर्षीय अवनी लेखरा हिने सुवर्णपदक पटकावले होते. अंतिम फेरीत सिंहराज अधानाने चांगली सुरुवात केली. पहिल्या 10 शॉटमध्ये त्याने 99.6 गुण मिळवत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. नेमबाज मनीष नरवालची अंतिम फेरीत खराब सुरुवात झाली. त्याने पहिल्या टप्प्यात 97.2 गुण मिळवले आणि दुसर्या टप्प्यात तो बाद झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल सिंहराज अधानाचे अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये, पंतप्रधान म्हणाले, की सिंहराजने कठोर परिश्रम केले आणि उल्लेखनीय यश मिळवले. त्याचे अभिनंदन आणि त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.