। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेलमधील सेक्टर 15 येथील साईप्लाझा इमारतीजवळ ऑनलाईन मागवलेल्या चिकन न्युडल्समध्ये चिकन नसल्याचा जाब विचारल्याने एका महिला ग्राहकावर दुकानदार महिलेने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी जखमी महिलेने खांदेश्वर पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार नोंदवली आहे.
हरिग्राम केवाळे येथे राहणाऱ्या 25 वर्षीय निकिता मंडल यांनी स्विगीच्या समाजमाध्यमाद्वारे ऑनलाईन चिकन न्युडल्सची ऑर्डर दिली होती. ऑर्डर मिळाल्यानंतर न्युडल्समध्ये चिकन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत तक्रार करण्यासाठी त्या थेट ‘एन्जॉय स्नॅक्स अॅण्ड चायनीज’ या दुकानात पोहोचल्या. दुकानात त्यावेळी 37 वर्षीय ललिता प्रसाद उपस्थित होत्या. निकिता यांनी चिकन नसल्याबाबत जाब विचारताच दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन शिवीगाळ झाली. तक्रारीनुसार, याच दरम्यान ललिता यांनी दुकानातील मोठ्या पळीने निकिता यांच्यावर मारहाण केली. या हल्ल्यात निकिता जखमी झाल्या. मारहाणीनंतर निकिता यांनी तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी तक्रार नोंदवून संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. ऑनलाईन अन्नसेवांमुळे ग्राहकांचा वेळ व सोय जरी वाढली असली, तरी तक्रार मांडताना ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे ऑनलाईन खाद्यपदार्थ महागात पडल्याची चर्चा होती. ग्राहकांनी तक्रार करताना संयम राखावा, तसेच विक्रेत्यांनीही ग्राहकांशी सभ्य व कायदेशीर पद्धतीने वागावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे हे करीत आहेत.
दुकानदाराचा महिला ग्राहकावर हल्ला
